नवी दिल्ली: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६९ वी पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून आज देशभरात साजरी होत आहे. या विशेष दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे. समाज माध्यमांवर त्यांनी याविषयी एक ट्वीट करत संविधान निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन केले आहे.
https://x.com/narendramodi/status/1864863582997090421?s=46
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, “समानता आणि मानवी मूल्य जपण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान नेहमीच प्रेरणादायी आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या योगदानाची आठवण करतो, तेव्हा त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. जय भीम!”
मोदी यांनी ट्वीटसोबत यावर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील चैत्यभूमीला दिलेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करत भारतीय समाजात समतेचे मूल्य रुजवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाखो अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येऊन बाबासाहेबांना वंदन करत त्यांच्या विचारांचे स्मरण करत आहेत.