अर्जुनी मोर: पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत श्री चेतन वडगावे यांची सभापती म्हणून, तर सौ. निशाताई काशीवार यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. या निवडणुकीत दोघांची बिनविरोध निवड झाली असून, तालुक्यातील विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाशजी काशीवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री शिवाजी गहाने, डॉ. रुकीराम वाढई, श्री अल्लाउद्दीन राजानी, तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री गजानन परशुरामकर, माजी सरपंच सुभाष कापगते (पळसगाव) आदींनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे तालुक्यातील विकासकामांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, शेती व अन्य विकासकामे गतीमान करण्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सभापती चेतन वडगावे आणि उपसभापती निशाताई काशीवार यांनीही आपल्याला दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.
(वार्ता प्रतिनिधी)