पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवनातील एका उद्घाटन कार्यक्रमात मराठी भाषा संस्कृतपासून निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी मोदींच्या या विधानावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
सोनवणी म्हणाले, “मराठी भाषेला तुम्हीच अभिजात भाषेचा दर्जा दिला, म्हणजे ती स्वतंत्र भाषा असल्याचे मान्य केले. असे असताना मराठी संस्कृतपासून जन्माला आली असे सांगणे गैर आहे. हे विधान महाराष्ट्र धर्माचा पराभव करणारे आहे.”
यासंदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी महाराष्ट्रातील भाषातज्ज्ञ आणि साहित्यिकांमध्येही या मुद्द्यावर व्यापक चर्चा सुरू आहे.
‘महाराष्ट्र भाषा व महाराष्ट्र धर्म’ या विषयावर झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनावणी यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवाहावर तीव्र टीका केली. “राम-राम” सारख्या सहिष्णु संबोधनापासून “जय श्रीराम” या संकुचित राजकीय नार्यापर्यंत पोहोचलेल्या महाराष्ट्रीय समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोनावणी म्हणाले, “महाराष्ट्र धर्म म्हणजे सामूहिक आकांक्षा आणि सहअस्तित्वाची परंपरा. पण आज त्याला राजकीय हेतूंनी विकृत केले जात आहे. उत्तरेतील राजकारणाचे प्रभाव आमच्यावर लादले जात आहेत, आणि महाराष्ट्राची मराठी माणसं मात्र ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’च्या फॉरवर्ड संस्कृतीत बुडाली आहेत. विचार करण्याची, प्रतिकार करण्याची ताकद आपण हरवली आहे.” त्यांनी महाराष्ट्राच्या सहिष्णु वारसाच्या संरक्षणासाठी बौद्धिक आणि सामाजिक सक्रियतेची गरज भारदस्त शब्दांत मांडली.