जालना : मराठा समाज हा राजकारण करण्यासाठी एकत्र आलेला नव्हता. आपण आरक्षणासाठी समाज म्हणून एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला नाईलाजाने या रस्त्यावर जायला लावले आहे. त्यांनी आरक्षणाचा घास आपल्या तोंडून हिरावला आहे, असा आरोप करून ज्यांनी आपल्याला संपवलं त्यांना संपविण्यातही आपला विजय आहे, अशी उघड भूमिका मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करायचे की सत्ताधाऱ्यांना पाडायचे? यावर मंथन करण्यासाठी जरांगे पाटील यांनी समाजाची बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीत काही निर्णय झाला नाही. परंतु उमेदवार उभे केले पाहिजे की उमेदवार उभे न करता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम केले पाहिजे? यावर चर्चा झाल्याचे जरांगे यांनी सांगितले.
रविवारी राज्यातील समाज एकत्र येत विधानसभेविषयी चर्चा करणार असून दिवसभर मॅरेथॉन बैठका संपन्न होतील. उद्याचा निर्णय हा निर्णायक आहे आणि यावेळी घाई गडबड असायला नको.
उद्या निर्णय चुकायला नको, या निर्णयामुळे समाज अडचणीत येता कामा नये. समाज हा राजकारण करण्यासाठी एक आला नव्हता, आम्ही समाज म्हणून केवळ आरक्षणाकरिता एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला नाईलाजाने या रस्त्यावर जायला लावले आहे, असे जरांगे म्हणाले.
ज्यांनी समाजाची फसगत केली, त्यांना संपविणे गरजेचे
समाजाची फसगत झाली नाही पाहिजे, आणि आपल्याला जे संपवायला निघाले आहेत, त्यांना संपवणे गरजेचे आहे. ज्यांनी आपल्याला संपवले त्यांना संपवण्यात देखील विजय असतो. समाज संपवायचा ज्यांनी विडा उचलला आहे तर त्यांनाही संपविणे आपले काम आहे. याला त्याला निवडून आणण्यापेक्षा आपल्या मुलांच्या भविष्यावर कोण गंडांतर आणतंय तोच संपला पाहिजे, हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळवता येतो, असे काही नसते. आपल्याविषयी जो वाईट विचार करतो, आपल्या समाजविषयी द्वेष आहे, त्याला हरवणे सुद्धा विजय असतो. मला दिसत आहे, सर्व तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक या सर्वांचे मत एकच होते, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.