सडक अर्जुनी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित स्वराज्य सप्ताह कार्यक्रमांतर्गत तसेच संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आज सडक अर्जुनी शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानात शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
नगरपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात एकत्र येत परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प केला. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात आली. संत गाडगेबाबांच्या विचारांनुसार स्वच्छता हा एक सामाजिक धर्म आहे, आणि तो आचरणात आणण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेचे नागरिकांनी भरभरून स्वागत केले असून, यामुळे शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होईल, असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले. आमदार राजकुमार बडोले यांनी या अभियानाचे कौतुक करत, “संत गाडगेबाबांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. नगरपंचायत आणि नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार प्रशंसनीय आहे,” असे सांगितले.
